मालवण (प्रतिनिधी):
रेवंडी जेटीवर तळाशीलच्या मच्छिमारांना मासेवाहतूक व वाहने उभी करण्यास होत असलेल्या विरोधामुळे वाद चिघळला असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा मच्छिमार नेत्यांनी दिला आहे.
या प्रकरणी मच्छिमार नेत्यांनी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांची भेट घेत वस्तुस्थिती मांडत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. तोंडवळी–तळाशील येथील मच्छिमारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, संपूर्ण मच्छिमार समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वादाचे कारण काय?
कालावल खाडीत रेवंडी समोरील भागात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशाला तळाशील ग्रामस्थांनी विरोध केला होता. यानंतरच रेवंडी येथील काही ग्रामस्थांनी जेटीवर तळाशीलच्या मच्छिमारांना मासेवाहतूक व वाहन उभे करण्यास मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे मच्छिमारांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होत असून, मासे विक्री आणि वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच वाहनांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मच्छिमार नेत्यांचा इशारा
यावेळी मच्छिमार नेते दिलीप घारे म्हणाले की, “तळाशीलच्या मच्छिमारांवर होत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून तोडगा काढावा. अन्यथा सर्व मच्छिमार बांधव एकत्र येऊन रेवंडी जेटीवर आमरण उपोषण छेडतील आणि कायदेशीर मार्गाने न्याय मिळवतील.”
तहसीलदार गणेश लव्हे यांनी रेवंडी ग्रामपंचायतीशी समन्वय साधून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीस उपस्थित
या बैठकीस दिलीप घारे, छोटू सावजी, बाबी जोगी, संजय केळूसकर, भाऊ सादये, नागेश कोचरेकर, आनंद खडपकर, वसंत गावकर, भाऊ मायबा, नंदकुमार कोचरेकर, विद्याधर पराडकर, पुंडलिक जुवाटकर, केशर जुवाटकर, हनुमंत देऊळकर, गणेश रेवणकर यांसह अनेक मच्छिमार बांधव उपस्थित होते.
परिस्थिती तणावपूर्ण
रेवंडी–तळाशील वाद आता चिघळत चालला असून, प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मच्छिमारांच्या उपजीविकेशी संबंधित हा प्रश्न असल्याने, लवकरात लवकर तोडगा निघणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.







