मालवण प्रतिनिधी:
मालवण तालुक्यातील वायंगणी येथील 28 वर्षीय विवाहित महिला शिक्षिका अंतरा हर्षद दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यूला तब्बल एक महिना उलटूनही सत्य समोर आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गावातील महिला आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेत सखोल व वेळबद्ध चौकशीची जोरदार मागणी केली आहे.
संबंधित शिक्षिका या कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत्या. इयत्ता 1 ली ते 10 वीपर्यंत अध्यापन करत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले होते. त्यांच्या आकस्मिक आणि संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकमग्न असून, या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, घटनेनंतर सुरुवातीच्या 4 ते 5 दिवसांत तपासाची गती चांगली होती. डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक तपास तसेच सीआयडी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. मात्र त्यानंतर तपासाची गती मंदावल्याचा आरोप करण्यात आला आहे. अद्याप मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
या प्रकरणामुळे गावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामीण भागातील महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मृत शिक्षिकेच्या पश्चात लहान मूल असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवरही मोठा आघात झाला आहे.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 (समानतेचा अधिकार) आणि अनुच्छेद 21 (जीवनाचा अधिकार) यांचा उल्लेख करत, या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:
- तपास वेळबद्ध पूर्ण करावा
- Action Taken Report सादर करावा
- तपासावर सतत वरिष्ठ पातळीवर निगराणी ठेवावी
- प्रकरणाची महिला सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर नोंद घ्यावी
- दोषींवर कठोर कारवाई करावी
दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी 15 दिवसांत तपास निर्णायक टप्प्यावर नेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
या घटनेमुळे वायंगणीसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







