Around 700 farmers in Sindhudurg receive notices ahead of planned Mumbai-Goa highway blockade over pending mango and cashew compensation, raising tensions.
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
आंबा व काजू बागायतदारांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी उद्या नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्ग चक्काजाम करण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुमारे ७०० शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
उद्याच्या रास्ता रोको आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, प्रशासनाकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात तळ ठोकून असून त्यांनी बागायतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वी आंबा-काजू बागायतदारांना नुकसान भरपाई जाहीर करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही भरपाई जाहीर न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
१० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात २३ मार्चपूर्वी नुकसान भरपाई जाहीर न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आता शेतकरी उद्या मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी सायंकाळपासून ठिकठिकाणी नाकाबंदी करत आंदोलनकर्त्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासन पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याच्या तयारीत असल्याचा आरोप होत आहे.
तथापि, सर्व दबाव झुगारून उद्या रास्ता रोको आंदोलन करणारच, असा ठाम निर्धार बागायतदारांनी व्यक्त केला आहे.







