मालवण (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चौके नंबर १ मध्ये शालेय मुलांचा ‘खाऊ गल्ली’ हा उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेत आठवडा बाजाराप्रमाणे आपली दुकाने थाटून वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणि खाण्यासाठी ठेवले होते. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.
शाळेच्या या उपक्रमाचा शुभारंभ चौके गावचे सरपंच पी. के. चौकेकर तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ सदाशिव गावडे गुरुजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उद्योजक बिजेंद्र गावडे, माजी सरपंच सुरेश चौकेकर, सचिन आंबेरकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष गावडे, वावळ्याचे भरड मंडळाचे अध्यक्ष दत्ता गावडे, माजी सभापती मनीषा वराडकर, निवृत्त शिक्षक विजय चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य जयश्री कदम, विशाखा चौकेकर, संघर्ष बचत गट निरा सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावडे, उपाध्यक्ष पूर्वा गावडे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा चौकेकर, आशा स्वयंसेविका सिद्धाली गावडे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक भाग्यश्री कुनुरे, मनीषा डाके तसेच पालक ग्रामस्थ उपस्थित होते.
‘खाऊ गल्ली’ या उपक्रमात शालेय मुलांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ शाळेच्या आवारात विक्रीसाठी ठेवले होते. यावेळी चौकेतील ग्रामस्थांनी मुलांकडून मनसोक्त खरेदी केली. यामुळे बालवयातच मुलांना व्यापार कसा करावा, याचा धडा मिळाला. शाळेतील लहान मुलांनी भरवलेली ‘खाऊ गल्ली’ सर्वांना आनंद देऊन गेली. ‘खाऊ गल्ली’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ व पालकांनी मेहनत घेतली.







