Shiv Sena (UBT) corporators stopped an alleged encroachment near the municipal parking area at Bharad in Malvan after repeated complaints to the municipal council. The incident led to a tense verbal exchange with the shop owner.
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील भरड येथे मुख्य रस्त्यालगत नगरपालिकेच्या वाहनतळासमोर झालेली अतिक्रमणे हटवावीत अशी वारंवार मागणी मालवण नगरपालिकेकडे करूनही कारवाई होत नसल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवकांनी स्वतःच पुढाकार घेत याच वाहनतळासमोर रस्त्यालगत चालू असलेले एका दुकानाचे अतिक्रमण रोखले. यावेळी ठाकरे शिवसेना नगरसेवक व संबंधित व्यावसायिक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. स्वच्छ सुंदर मालवण शहरासाठी तसेच अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करून नागरिकांना मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी, आम्ही कटिबद्ध असून यासाठी आम्हाला कोणी मारायला आल्यास मार खाण्यासही तयार आहोत, मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ देणार नाही, असा आक्रमक इशारा म्हाडगुत यांनी दिला
दरम्यान, देऊळवाडा पुलाजवळ नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अतिक्रमण करण्यात आले आहे या अतिक्रमणावर नगरपालिकेने कारवाई न केल्यास ठाकरे शिवसेना कोणत्याही क्षणी या अतिक्रमणांच्या हटावासाठी आपली पावले उचलेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे
मालवण शहरातील विविध रस्त्यांवर रस्त्यांच्या कडेला विक्रेते व स्टॉल धारकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. मालवण शहरातील मालवण – कसाल या मार्गावरील भरड ते देऊळवाडा रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याबाबत ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर यांनी नगरपालिकेचे निवेदनाद्वारे लक्ष वेधत अतिक्रमाणे हटविण्याची मागणी केली होती. या मार्गावर असलेल्या नगरपालिकेच्या वाहनतळाच्या समोरच असलेली अनेक अतिक्रमणे हटविण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती. मात्र याबाबत नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने आज ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच पुढाकार घेत याच मार्गावर नगरपालिकेच्या पार्किंग तळासमोरील भागात रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या एका भाजी विक्रेत्याच्या दुकानाचे शेडचे बांधकाम रोखले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, युवासेनेचे उमेश चव्हाण, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते. यावेळी संबंधित व्यावसायिक व ठाकरे शिवसेना नगरसेवक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याने काही काळ वातावरण तंग बनले होते.
दरम्यान, स्वतः नगरसेवकांनी अतिक्रमण रोखण्यासाठी पाऊल उचलल्याचे समजताच हडबडलेल्या नगरपालिकेच्या प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपस्थित नगरपालिका अधिकाऱ्यांनी संबंधित व्यवसायिकास अतिक्रमण करू नये असे तोंडी आदेश दिले.
यावेळी महेंद्र म्हाडगुत म्हणाले, भरड नाका ते देऊळवाडा हा मालवण शहरातील मुख्य रस्ता असून या रस्त्याच्या दुतर्फा अनेक अतिक्रमणे झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. वाहतुकीला अडथळा होत असून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे याबाबत आम्ही नगरपालिकेचे वारंवार लक्ष वेधत अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. शेवटी नाईलाजास्तव आज आम्ही स्वतः कारवाईची भूमिका घेतली. याठिकाणी रस्त्याच्या कडेला अनधिकृत बांधकाम केले जात होते ते रोखण्यास आम्ही आलो. ही अतिक्रमाणे हटविल्यावर रस्ता मोकळा होईल व नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार नाही, याची दक्षता आम्ही घेणार आहोत, असेही म्हाडगुत म्हणाले.
आम्ही ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी पैसे खाण्याचा विडा घेतलेला नाही. तर मालवण शहर स्वच्छ सुंदर कसे होईल, नगरपालिका आर्थिक दृष्ट्या सक्षम कशी होईल, रस्ते मोकळे कसे होतील, नागरिकांणा मोकळा श्वास कसा घेता येईल यासाठी आम्ही नेहमी झटत राहू. यासाठी आम्हाला कोणी मारायच्या धमक्या दिल्या तर मालवणच्या नागरिकांसाठी आम्ही मारही खायला तयार आहोत, असेही महेंद्र म्हाडगुत म्हणाले.
मालवण शहरात जी नवीन बांधकामे झाली आहेत, नवीन इमारती झाल्या आहेत, त्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी जी जागा सोडली पाहिजे ती आजपर्यंत नगरपालिकेच्या एकाही प्रशासकाने व एकाही सत्ताधाऱ्यांनी ताब्यात घेतलेली नाही, या जागा नगरपालिकेने ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, नाहीतर रस्ता रुंदीकरण कधीच होणार नाही, रस्ता रुंदीकरणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, यासाठी वेळप्रसंगी उपोषणाचा मार्गही आम्ही स्वीकारू, असा इशारा यावेळी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी दिला.







