सिंधुदुर्गनगरी : विकासाची ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी जनगणनेतून प्राप्त होणारी माहिती अत्यंत महत्त्वाची असून हे काम काळजीपूर्वक व विनाचूक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा मुख्य जनगणना अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. जनगणना कार्य संचालनालय, महाराष्ट्र यांच्या वतीने जनगणना-२०२७ संदर्भातील कार्यवाही सुरू असून दोन टप्प्या मध्ये ही जनगणना होणार आहे.
पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार्ज अधिकारी, अतिरिक्त चार्ज अधिकारी तसेच जनगणनेशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील घरांची यादी तयार करणे (House Listing Blocks Formation) या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण प्रसंगी उपस्थितांना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जनगणनेचे सहाय्यक संचालक जोगेंद्र तामगाडगे तसेच सांख्यिकी अन्वेषक नेहाल धुरंधरे हे मुख्य प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रशिक्षणादरम्यान जनगणना कार्यातील विविध बाबी, माहिती संकलनाची प्रक्रिया तसेच क्षेत्रीय पातळीवरील अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जनगणना-२०२७ ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असणार असून त्यामध्ये मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती नोंदविण्यात येणार आहे. तसेच ठिकाणांचे जिओ टॅगिंगही करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील तांत्रिक बाबी पूर्णपणे समजून घेऊन जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने या मोहिमेसाठी विशेष AI Assist सुविधा निर्माण केली असल्याने कामात अधिक अचूकता साध्य होईल. जनगणना करताना शासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे व कोणतीही चूक होऊ नये, यासाठी प्रगणकांच्या प्रशिक्षणावर विशेष भर द्यावा. कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनामागील उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर याद्यांनुसार माहिती संकलित केली जाणार असून हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्वांनी काम करावे असेही त्या म्हणाल्या. तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात प्रशिक्षकांनी जनगणना प्रक्रियेतील हाऊस लिस्टिंग, माहिती संकलनाची पद्धत तसेच डिजिटल माध्यमातून माहिती नोंदणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जनगणना-२०२७ च्या अनुषंगाने १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना (Self Enumeration) आणि १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ दरम्यान घरोघरी जाऊन (House to house field work) भेट दिली जाणार आहे.या सर्व मुद्यांबाबतही सहभागी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.







