सिंधुदुर्गनगरी : मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या कंपन्यांच्या प्रतिनिधी व समन्वयकांशी संपर्क साधला आहे. संबंधित कंपन्यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नियमित व सुरळीत पुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती दिली आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सींमार्फत इंधनाचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. नागरिकांनी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सेवेस तत्पर असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही श्रीमती धोडमिसे यांनी स्पष्ट केले.







