सिंधुदुर्गनगरी, दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर रामा कदम (रा. पोखरण) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन क्षेत्रासह भजनप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बुवा समीर कदम यांच्या निधनाने भजन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. भजनाच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
दरम्यान, त्यांनी गायलेले ‘काय चुकले स्वामी राया, हात द्यावा सावराया’ हे भजन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समीर कदम यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हे भजन ऐकताना त्यांच्या चाहत्यांच्या आणि भजनप्रेमींच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.
सुरेल आवाज, भक्तिरस आणि भावपूर्ण गायकीच्या माध्यमातून रसिकांच्या मनात घर करणारा हा भजनी स्वर आज कायमचा शांत झाला आहे. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गच्या भजन परंपरेतील एक हळवा अध्याय संपला आहे.






