Malvan Tahsildar Ganesh Lavhe urged revenue officials to follow the ideals of Chhatrapati Shivaji Maharaj and work dedicatedly for public welfare during the Shiv Jayanti celebration organized by the Tahsil administration.
मालवण (प्रतिनिधी) :
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसोबतच जनतेच्या अडचणी जाणून त्यांची तत्परतेने सोडवणूक करण्याला प्राधान्य दिले. त्यांचा हाच लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने अंगीकारून जनतेची कामे प्रामाणिकपणे व संवेदनशीलतेने करावीत, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश लव्हे यांनी केले.
मालवण तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डी.एड. कॉलेज मालवणच्या प्रा. आनंदी घोगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, न्यायप्रिय राज्यकारभार आणि लोककल्याणकारी धोरणांवर प्रकाश टाकला. तर बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले यांनी शिवरायांच्या सशक्त सागरी आरमाराची माहिती देत कोकण किनारपट्टीच्या संरक्षणातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमात दीप घोगळे यांनी सादर केलेल्या शिवचरित्रावर आधारित जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांमध्ये देशभक्ती व प्रेरणेचे वातावरण निर्माण केले.
या प्रसंगी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.







