मालवण | प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विशेष दिव्यांग आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती संस्था, कसाल येथील ३० तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ, महाराष्ट्र कोकण विभागाची सावंतवाडी व गोवा विभागीय शाखेतील ३५ दिव्यांग सहभागी झाले होते.
मेळाव्याचा शुभारंभ सेवांगणचे कार्याध्यक्ष शैलेश खांडाळेकर, अनिल शिंगाडे, बाबुराव गावडे व संदीप तांबे यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यात कमलाकांत शिरोडकर यांनी प्रथम, सौ. दूर्वा निर्गुण यांनी द्वितीय तर ललित गावडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
त्यानंतर आयोजित बास्केट बॉल स्पर्धेत रिया मुंबरकर प्रथम, रंजना इंदुलकर द्वितीय आणि अनिल शिंगाडे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. स्पर्धेनंतर सहभागींसाठी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारच्या सत्रात गीतगायन स्पर्धा कोकण क्रांती ग्रुप व दिव्यांग भरारी ग्रुप अशा दोन गटांमध्ये पार पडली. यात मेघना नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील दिव्यांग भरारी ग्रुपने प्रथम क्रमांक मिळविला, तर गणेश शिरसाट यांच्या नेतृत्वाखालील कोकण क्रांती ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला. संगीत खुर्ची स्पर्धा महिला व पुरुष गटात घेण्यात आली असून महिला गटात जयश्री मेजरे आणि पुरुष गटात संदीप माळवदे विजेते ठरले. सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यानंतर दिव्यांग सहभागी व सेवांगण कर्मचाऱ्यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला भेट दिली. समुद्रकिनाऱ्यालगत पायी प्रवास करत राजकोट, सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन तसेच चिवला किनाऱ्याचे दर्शन घेत पुन्हा सेवांगणमध्ये परतण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जीवन प्रेरणा संस्थेचे व्यवस्थापक संजय आचरेकर यांनी शिवरायांच्या कार्याची प्रेरणादायी माहिती दिली. यावेळी अनिल शिंगाडे, बाबुराव गावडे तसेच उपस्थित दिव्यांग शिवप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हा आनंद मेळावा दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक ठरला.







