मालवण | प्रतिनिधी
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दुरावस्थेचा मुद्दा “आमने सामने” या नाट्यप्रयोगादरम्यान कलाकारांनी जनतेसमोर मांडल्यानंतरच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जाग आली का? असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
नाट्यगृहाच्या अस्वच्छता व गैरसोयींचा प्रश्न अनेक दिवसांपासून कायम असतानाही लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र कलाकारांनी नाट्यगृहाचे वास्तव उघड केल्यानंतर स्थानिक माध्यमे व सोशल मीडियावर चर्चा रंगली आणि त्यानंतर सत्ताधारी एकत्र येऊन कार्यक्षमतेचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका वाईरकर यांनी केली.
वर्षभरापूर्वी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नाट्यगृहासाठी निधी जाहीर केला होता. त्या निधीचे पुढे काय झाले, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मालवण हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून नाट्यगृहासह शहरातील अनधिकृत फेरीवाले, स्वच्छतागृहांची समस्या, बेशिस्त पार्किंग यांसारखे अनेक प्रश्न गंभीर बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात कोणत्याही निवडणुका नसल्याने आता सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर विकासासाठी काही ठोस उपाययोजना सुचविण्यासाठी लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेणार असल्याचेही वाईरकर यांनी स्पष्ट केले असून विकासकामांवर मनसेचे बारकाईने लक्ष राहील, असा इशाराही त्यांनी दिला.







