Malvan Deputy Nagaradhyaksha Deepak Patkar takes action mode to address cleanliness issues at Mama Varerkar Auditorium, leading a major cleanup drive and restoring hygiene in the theatre premises.
- मामा वरेरकर नाट्यगृहातील अस्वच्छता व गैरसोयींवरून परिसर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत
- उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या पुढाकाराने विहिरीतील कचरायुक्त पाण्याचा उपसा
- ठेकेदाराकडील बांधकाम साहित्य व दगड-धोंडे हटविल्याने नाट्यगृह परिसर स्वच्छ
- स्वच्छता मोहिमेमुळे नाट्यगृह परिसर चकाचक; नागरिकांकडून कार्याचे कौतुक
मालवण | प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छता व गैरसोयींमुळे चर्चेत आलेल्या मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या परिसरात अखेर स्वच्छतेची ठोस सुरुवात झाली असून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या धडाकेबाज पुढाकारामुळे नाट्यगृह परिसर चकाकू लागल्याने मालवणकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर व लोकप्रतिनिधींनी नुकतीच नाट्यगृहाची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर मंगळवारपासून नाट्यगृह परिसरात धडक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या कलादालनाच्या कामासाठी परिसरात टाकण्यात आलेले दगड, धोंडे व बांधकाम साहित्य हटविण्यात आल्याने नाट्यगृह परिसर आता स्वच्छ आणि मोकळा दिसू लागला आहे.
यामध्ये उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी घेतलेला पुढाकार विशेष लक्षवेधी ठरला. नाट्यगृहासमोरील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व कचरा साचून पाणी दूषित झाल्याचे निदर्शनास येताच पाटकर यांनी तात्काळ स्वच्छतेचे काम हाती घेत स्वतःच्या खर्चातून विहिरीतील गाळ व कचऱ्याचा उपसा करून विहीर पूर्णतः स्वच्छ करून घेतली. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या विहिरीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
भविष्यात विहिरीत पुन्हा कचरा टाकला जाऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विहिरीवर ग्रीन मॅट बसविण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे उपनगराध्यक्ष पाटकर यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, नाट्यगृहातील अस्वच्छता आणि गैरसोयींबाबत अभिनेत्री लीना भागवत व सहकलाकारांनी व्यक्त केलेल्या नाराजी तसेच स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्तांची दखल घेत नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नाट्यगृहाला भेट देत प्रशासनाला धारेवर धरले होते.
त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून स्वच्छता व अडगळ हटविण्याचे काम वेगाने सुरू झाले असून नागरिकांकडून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या तत्परतेचे विशेष कौतुक होत आहे.
तथापि, नाट्यगृह परिसरात पडून असलेल्या भंगारातील अग्निशमन गाडी व फिरत्या प्रसाधनगृहाच्या गाड्या कधी हटविण्यात येणार, याकडे आता मालवणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.







