मालवण | प्रतिनिधी
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा संस्थेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता ‘होममिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा संस्थेच्या सभासद असलेल्या सौभाग्यवतींसाठी आयोजित करण्यात आली आहे.
पाच फेऱ्यांत रंगणार स्पर्धा
होममिनिस्टर स्पर्धा एकूण पाच फेऱ्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या फेरीपासूनच स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी स्थानिक तसेच आचरा ग्रामस्थ व परदेशस्थ महिला प्रायोजकांनी सहकार्य केले आहे.
विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके
स्पर्धेतील
- विजेत्या होममिनिस्टरला सौ. वैशाली देसाई (देसाई साडी सेंटर, आचरा) यांच्याकडून पैठणी साडी,
- उपविजेत्या स्पर्धकाला सौ. अनिता आनंद आचरेकर यांच्याकडून सोन्याची नथ प्रदान करण्यात येणार आहे.
प्रेक्षक व विद्यार्थ्यांसाठीही स्पर्धा
कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अचूक उत्तरे देणाऱ्यांना सौ. मानसी राणे यांच्याकडून बक्षिसे दिली जाणार आहेत.
तसेच विद्यार्थी वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार असून निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांना सौ. प्रज्ञा पेडणेकर यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील.
सर्व स्पर्धकांसाठी भेटवस्तू
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व ३२ स्पर्धक महिलांना श्रीम. नेहा घाडी, सौ. सई राणे (कुलसूम नर्सरी), सौ. स्वाती पेडणेकर, सौ. सानिका दुखंडे, सौ. श्रुती सावंत (ग्रामपंचायत सदस्या) तसेच सौ. किशोरी आचरेकर (ग्रामपंचायत सदस्या) यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहेत.
संपर्कासाठी आवाहन
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी (दूरध्वनी : ०२३६५-२४६०१७ / ९४२१२६३३४६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे व कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सहभागातून उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.








