मालवण | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधी सेवा समिती, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार मालवण येथील दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) येथे शनिवार, दि. १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही लोकअदालत तालुका विधी सेवा समिती, मालवण आणि तालुका बार असोसिएशन, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.
दिवाणी, फौजदारी व वादपूर्व प्रकरणांचा समावेश
या लोकअदालतीमध्ये दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच विविध राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था आणि ग्रामपंचायतींकडील वादपूर्व प्रकरणांचाही समावेश करण्यात येणार आहे.
जलद आणि कमी खर्चात न्याय
लोकअदालतीच्या माध्यमातून पक्षकारांना जलद, सुलभ आणि कमी खर्चात न्याय मिळण्याची सुविधा उपलब्ध होते. परस्पर चर्चेद्वारे वाद मिटविण्याची ही प्रभावी संधी असल्याने संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पक्षकारांना उपस्थित राहण्याचे आवाहन
ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे तडजोडीने निकाली काढायची आहेत त्यांनी ती प्रकरणे लवकरात लवकर तालुका विधी सेवा समिती, मालवण कार्यालयाकडे सादर करावीत. तसेच संबंधित पक्षकारांनी लोकअदालतीच्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), मालवण तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. के. फकिह यांनी केले आहे.








