मालवण | प्रतिनिधी
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण (वर्ष २०२६) यांच्या संयोजकपदी पत्रकार अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे. आगामी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे नियोजन, आयोजन व समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मालवण शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजित केली जाते. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध स्तरांवर तयारी सुरू करण्यात आली असून त्यासाठी समितीची नव्याने कार्यकारिणी निश्चित करण्यात येत आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने १९ मार्च गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण शहरातून निघणार आहे. स्वागत यात्रेचे हे 23 वे वर्ष असून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संस्थापक भाऊ सामंत व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत भरड दत्तमंदिर येथे समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी संयोजक प्रशांत हिंदळेकर, बंटी केनवडेकर, भूषण साटम, रत्नाकर कोळंबकर, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, कृष्णा ढोलम, सौगंधराज बादेकर, अरविंद मयेकर, अमृता फाटक, अस्मिता निव्हेकर यांसह अन्य सदस्य उपस्थित होते.
भव्यदिव्य स्वरूपात चित्ररथ आकर्षक चलचित्र देखावे, ढोलपथक, वेशभूषा स्पर्धक आणि तमाम मालवण वासीय यांच्या सहभागातून भगव्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गुढी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी निघणार आहे. त्या दृष्टीने नियोजन व प्राथमिक चर्चा करण्यात आली असून पुढील महत्वपूर्ण बैठक शुक्रवार 27 फेब्रुवारी सायंकाळी 5 वा. भरड दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने देण्यात आली आहे.
पत्रकारितेसोबत सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या अमित खोत यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदाची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अधिक उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, असा विश्वास समिती सदस्यांनी व्यक्त केला आहे.








