मालवण (प्रतिनिधी):
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यावरणपूरक विचारांना उजाळा देत वृक्षसंवर्धन करणाऱ्या वायरी, मालवण येथील रेवंडकर कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्यात आली. शिवाजी महाराजांनी आरमार उभारताना झाडांच्या संवर्धनाबाबत दिलेल्या सूचनांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.
“रयतेने लेकरांसारखी जपलेली झाडे तोडताना त्यांना दुःख होणार नाही, याची काळजी घ्यावी,” असा महाराजांचा दृष्टीकोन होता. त्याच भावनेतून झाडांवर अतिव प्रेम करणाऱ्या रेवंडकर कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.
Youth Bits for Climate (Ecomates) या संस्थेच्या वतीने मोहन रेवंडकर आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली. त्यांच्या घरासमोर सुमारे दीडशे वर्षांहून अधिक जुने ‘इरय’ (जंगली बदाम) वृक्ष दिमाखात उभा आहे. भला मोठा बुंधा आणि विशिष्ट उंचीवरून चारही दिशांना पसरलेल्या जाड फांद्या हे या वृक्षाचे वैशिष्ट्य आहे.
या फांद्यांच्या मध्यभागी गेली सुमारे ३५ वर्षे एक भलेमोठे घरटे आहे. चार ते सहा फूट रुंद असलेल्या या घरट्यात ‘समुद्र गरुड’ या पक्ष्याची जोडी दरवर्षी येते. मोहन रेवंडकर यांनी सांगितले की, सुरुवातीला हा परदेशी पक्षी असावा असे वाटत होते; नंतर तो समुद्र गरुड असल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी ही जोडी घरटे दुरुस्त करते, नव्या काड्या आणते. त्या काड्या इतक्या मजबूत असतात की सहजासहजी तुटत नाहीत.
१९९३ साली आलेल्या वादळात एक पिल्लू खाली पडले होते. ते सुरक्षित ठिकाणी नेऊन वाचविण्यात आले. तेव्हापासून हा समुद्र गरुड कुटुंबाचा जणू एक भागच बनला आहे. संध्याकाळी दोन्ही पक्षी घरट्यात परततात. पिल्लांना उडायला शिकवण्याचा त्यांचा संघर्षमय पण रम्य प्रवास पाहणे अवर्णनीय असल्याचे कुटुंबीय सांगतात.
पक्षी ताजे मासे घेऊन येतात. काहीवेळा ते खाली पडून परिसरात दुर्गंधी पसरते; मात्र हे त्यांच्या जगण्याचा भाग असल्याने त्याचीही सवय झाल्याचे रेवंडकर कुटुंबियांनी नमूद केले. “हे झाड उत्पन्न देणारे नसले तरी पक्ष्यांसाठी ते जपणे आमचे कर्तव्य आहे, झाड मोडून पडण्याची भीती वाटत असली तरी ते जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील पिढीही या वृक्षासह समुद्र गरुडांचे संरक्षण करण्यास सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मेगल डिसोजा यांनी ‘पर्यावरणीय बुद्धिमत्ता’ हे पुस्तक भेट देऊन कुटुंबाचा गौरव केला. स्वाती पारकर, कमल बांदकर, दर्शन वेंगुर्लेकर, अक्षय रेवंडकर, ऐश्वर्य मांजरेकर, राहुल जाधव, तेजस कातवणकर, मनीषा पारकर, गौरी कुमामेकर, ममता कुमामेकर, चारुशीला देऊलकर, केळूसकर सर, मळेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्ष आणि पक्ष्यांप्रती असलेले रेवंडकर कुटुंबियांचे प्रेम हे पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरत आहे.








