District-level Mahila Lokshahi Din will be held on February 16, 2026, at Sindhudurg Collector Office. Women facing issues are encouraged to submit applications and seek grievance redressal through this government platform
सिंधुदुर्गनगरी:
फेब्रुवारी महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग करून आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे.
राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला समान हक्क व संधीचा मूलभूत अधिकार आहे. महिलांना त्यांच्या समस्या व तक्रारी मांडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्या तक्रारींची शासकीय यंत्रणेमार्फत प्रभावी सोडवणूक व्हावी, या उद्देशाने जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी हा कार्यक्रम घेतला जातो.
महिलांच्या हक्कांचे संरक्षण व त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिला लोकशाही दिन हा एक प्रभावी उपक्रम ठरला आहे. समस्याग्रस्त महिलांनी आपल्या तक्रारी विहित नमुन्यात अर्ज करून सादर कराव्यात. अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे उपलब्ध आहे.
अर्ज वैयक्तिक स्वरूपाचा असावा. न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महिलांनी आपल्या अडचणींची योग्य नोंद करून या लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.







