Guardian Minister Nitesh Rane assured maximum government funding for the development of Kunakeshwar after offering prayers on Maha Shivratri, praising the Plastic-Free Yatra initiative by Sindhudurg administration.
देवगड प्रतिनिधी – महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचीन व ऐतिहासिक श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिवत दर्शन घेऊन भगवान श्री कुणकेश्वराची मनोभावे पूजा केली
यावेळी बोलताना त्यांनी कुणकेश्वराशी असलेले आपले वैयक्तिक आणि सार्वजनिक नाते अधोरेखित केले. “गेल्या अनेक वर्षांपासून मी नियमितपणे कुणकेश्वर यात्रेला येत असून येथे दर्शन घेणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद लाभला आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कुणकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी असून, विकासकामांसाठी शासनामार्फत अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी कुणकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कुणकेश्वर यात्रेनिमित्त राबविण्यात आलेल्या ‘प्लास्टिक मुक्त यात्रा’ या अभिनव उपक्रमाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवत यात्रेदरम्यान प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रभावी निर्णय घेतला. स्वच्छ, सुंदर आणि हरित कुणकेश्वर घडवण्याचा संकल्प प्रशासनाने कृतीतून साकारला आहे.
भाविकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करत यात्रा शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षण आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन यांचा सुंदर समन्वय साधणाऱ्या या उपक्रमाबद्दल त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.








