पहाटेच्या अंधुक प्रकाशात दिव्यांच्या उजेडात न्हालेली आंगणेवाडी आणि देवीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या हजारो भाविकांची रांग… श्रद्धेच्या या अखंड प्रवाहात भराडी मातेच्या यात्रोत्सवाला मंगल प्रारंभ झाला.

‘श्री भराडी माते नमो नमः… भराडी माते तुझा जयजयकार असो…’ अशा गगनभेदी जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला आणि भक्ती, श्रद्धा व उत्साहाच्या लाटेवर स्वार होत दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील श्री देवी भराडी यात्रोत्सवाला सोमवारी पहाटे दणदणीत प्रारंभ झाला. पहाटे तीन वाजल्यापासूनच देवीच्या प्रांगणात भाविकांचा महासागर उसळला होता. आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते वाहनांनी गजबजून गेले होते.

धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांसाठी देवीचे दर्शन खुले करण्यात आले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नऊ स्वतंत्र रांगांमधून दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांग भाविकांसाठी आंगणे ग्रामस्थ मंडळातर्फे रिक्षाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शिस्तबद्ध नियोजनामुळे दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडली.

देवीच्या दर्शनानंतर स्वागत कक्षात आंगणे कुटुंबियांच्या वतीने यात्रेनिमित्त उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात येत होता. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, स्टॉल व हॉटेल्सची रेलचेल होती.

प्रसाद, खाद्यपदार्थ, कपडे, खेळणी, शोभेच्या वस्तू, लोखंडी भांडी, शेती अवजारे तसेच लाकूड व बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चहाचे स्टॉल व हॉटेल्समध्येही भाविकांची वर्दळ वाढली होती. यामुळे यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे चित्र होते. मुलांसाठी विविध खेळ, आकाशपाळणा, ‘मौत का कुआ’ यांसारखे साहसी खेळही आकर्षणाचे केंद्र ठरले.

यात्रेत भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांची कार्यालये उभारण्यात आली होती. संबंधित पक्षांच्या नेत्यांनी या कार्यालयांना भेटी दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतर्फे महिला बचत गटांच्या उत्पादित मालाचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी विविध स्टॉलद्वारे आपल्या उत्पादनांची विक्री केली असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पहाटेपासून भाविकांनी रांगांमधून भराडी मातेचे दर्शन घेतले. दर्शनासाठीच्या रांगा लांबच लांब पसरलेल्या दिसून येत होत्या. एस.टी. महामंडळाने मसुरे, मालवण व कणकवली या तिन्ही स्थानकांवरून प्रवाशांसाठी सुरळीत सेवा पुरविली. गावागावातून यात्रा विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले होते.

जिल्हा बँकेच्यावतीने फिरती एटीएम सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. बचत गटांना स्टॉल देऊन स्वावलंबनाला चालना देण्यात आली. नियंत्रण कक्षामार्फत ग्रामस्थांना व भाविकांना वेळोवेळी सूचना देऊन सुरक्षितता व सुव्यवस्थेची काळजी घेण्यात आली आहे.








