कुडाळ | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त कुडाळ येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही जाहीर सभा आज सायंकाळी ४ वाजता कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथील मैदानावर होणार आहे.
या जाहीर सभेला मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार रविंद्र फाटक, उपनेते संजय आंग्रे, शिवसेना सचिव संजय मोरे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संपर्कप्रमुख राजेश मोरे तसेच महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही सभा महायुतीसाठी महत्त्वाची असून, मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याच्या दृष्टीने ही सभा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.







