मालवण दि प्रतिनिधी
राज्याच्या लाडक्या व्यक्तिमत्वात ज्यांची गणना होते असे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे झालेले निधन ही धक्कादायक घटना आहे, अजितदादांच्या अपघाती आणि अकाली मृत्यूने राज्याची अपरिमित हानी झाली आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर यांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना अजितदादा पवार यांच्या मृत्यूने धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर यांनी शोक व्यक्त करताना आम्ही अजितदादा पवार यांच्या पक्षात जरी नसलो तरी पवार घराण्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत.
अजितदादांनी कोकणच्या विकासासाठी जी कामे केली ती विसरता येणारी नाहीत. बेधडक वृत्ती, स्पष्टवक्ता, वेळेचे बंधन पाळणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांची ओळख होती. एकसंध राष्ट्रवादी पक्षात असताना अजितदादांना भेटण्याचे प्रसंग आले. कार्यकर्त्यांची मने जाणणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. अजितदादा पवार यांचे निधन म्हणजे न पचवीता येणारा धक्का आहे.
अजितदादा पवार यांच्या निधनाने पवार घराण्याबरोबरच महाराष्ट्राची हानी झाली आहे, पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी भावना प्रमोद कांडरकर यांनी व्यक्त केली आहे.







