मालवण | प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वायरी भूतनाथ जि. प. मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या माजी जि. प. सदस्या व माजी उपसभापती सौ. संजीवनी संजय लुडबे यांनी पक्षादेशाचा मान राखत आपली उमेदवारी मागे घेतली. शिंदे शिवसेना तसेच शिवसेना–भाजप महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतल्याने पक्षनिष्ठेचे दर्शन घडले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सौ. लुडबे यांनी अधिकृतरीत्या माघार घेतल्यानंतर या मतदारसंघातून शिंदे शिवसेनेने तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या पत्नी सौ. अक्षता गावडे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महायुतीच्या रणनितीला बळ मिळाले आहे.
दरम्यान, सौ. संजीवनी लुडबे यांच्या निर्णयानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, त्यांचे पुत्र व युवा कार्यकर्ते मंदार लुडबे यांची शिंदे शिवसेनेच्या मालवण तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती म्हणजे पक्षाने दाखविलेल्या विश्वासाची पावती असल्याचे मानले जात आहे.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत घेतलेल्या या भूमिकेची दखल पक्षाच्या वरिष्ठांनी घेतली असून, सौ. संजीवनी लुडबे यांना येत्या काळात पक्षात सन्मानजनक जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे.







