कणकवली :
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे देश व महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या प. पू. भालचंद्र सभागृहात आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना अजित पवार यांनी कणकवली शहराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. कणकवलीच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या अकाली निधनाने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थनाही पारकर यांनी केली.
शोकसभेच्या प्रारंभी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, सर्व नगरसेवक नगरसेविका व मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी न.पं. चे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, अजित पवार यांचा प्रशासनावर जबरदस्त अंकुश होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावी नेतृत्वाला मुकली आहे. वेळेचे महत्त्व ओळखून काम करणारे ते कडक शिस्तीचे नेते होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे कणकवली नगरपंचायतीची नियोजित बैठक तहकूब करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. पुढील बैठक कधी घेण्यात येणार, याची माहिती नगरपंचायतीकडून नगरसेवकांना कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल नगराध्यक्ष संदेश पारकर व नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहिली.







