मालवण : प्रतिनिधी
मराठी भाषा ही आपली संस्कृती असून ती टिकवण्यासाठी मराठी साहित्याचे वाचन होणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी पालकांनी स्वतः मराठी साहित्य वाचावे आणि आपल्या पाल्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन पत्रकार व समुपदेशक संग्राम कासले यांनी केले.
मालवण न्यायालय येथे मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक अधीक्षक (प्रशासन) एस. एन. पालव, सहायक अधीक्षक (वित्त) श्रीमती एम. एम. मोर्ये यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
संग्राम कासले पुढे म्हणाले की, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आजची युवा पिढी वाचनापासून दूर जात आहे. मात्र या पिढीला पुन्हा वाचनसंस्कृतीशी जोडणे ही काळाची गरज आहे. वाचनाच्या माध्यमातूनच मूल्ये व संस्कार युवा पिढीपर्यंत पोहोचवता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवायचे असेल, तर त्यांना लहानपणापासून वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरातूनच केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालयांमध्ये जाणाऱ्या युवकांचे प्रमाण कमी होत चालल्याची खंत व्यक्त करत कासले म्हणाले की, हे प्रमाण वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. शाळा व महाविद्यालयीन स्तरावर सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाचक स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन झाले पाहिजे. अशा उपक्रमांमुळे युवा पिढी पुन्हा वाचनसंस्कृतीकडे वळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कनिष्ठ लिपिक सुविधा जाधव यांनी मानले.







