मालवण प्रतिनिधी
चौके गावात शनिवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भांडी विक्रीसाठी आल्याचे भासवणाऱ्या दोन अनोळखी महिलांनी चिरेखाणीत काम करणाऱ्या महिलांना गाठत विश्वास संपादन केला आणि दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करून पसार झाल्या.
बाजारपेठेजवळ भाड्याने राहणाऱ्या चिरेखाण कामगार महिलांच्या घरी जाऊन या दोघींनी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. दागिने मालवणला नेऊन कमी खर्चात चांगले पॉलिश करून देतो, असे सांगत त्यांनी मंगळसूत्र, कानातील दागिने व पायातील पैंजण आपल्या ताब्यात घेतले. दोन तासांत परत येतो, असे आश्वासन देऊन निघालेल्या महिला मात्र परतल्या नाहीत.
बराच वेळ वाट पाहूनही दागिने न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलांनी थेट मालवण गाठत त्या अज्ञात महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून या संशयित महिला भांडी विक्रीच्या नावाखाली चौके परिसरात फिरत होत्या. या घटनेनंतर गावात एकच चर्चा रंगली असून विशेषतः महिला वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







