वेंगुर्ला : आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्रीराम समर्थ, वेंगुर्ला यांच्या पुरस्कृत 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी 2026 सालातील पहिली जिल्हास्तरीय संस्कृत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रविवार दि. 25 जानेवारी 2026 रोजी वेंगुर्ले नगर वाचनालय येथे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पार पडणार आहे.
ही वक्तृत्व स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या गटात इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “गणपती स्तोत्र” या विषयावर 3 मिनिटांचे वक्तृत्व सादरीकरण ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या गटात इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “माझी आई” या विषयावर 3 मिनिटांचे संस्कृत भाषेतील वक्तृत्व अपेक्षित आहे.
संस्कृत भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच त्यांच्या भाषिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेत जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आधार फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती व नावनोंदणीसाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी श्री. पांडुरंग सामंत सर (मो. ९४२०८२३०४८) तसेच डॉ. श्री. नंदन वेंगुर्लेकर (मो. ९८२३६०४३५६) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.





