आजचा माणूस प्रचंड धावपळीच्या आयुष्यात अडकलेला आहे. सकाळी अलार्म, ऑफिसची घाई, ट्रॅफिक, मीटिंग्स, टार्गेट्स, घरची जबाबदारी, मोबाईल स्क्रीन…या सगळ्यात स्वतःसाठी वेळ काढणं हीच सगळ्यात मोठी कसरत झाली आहे.
अशा वेळी “व्यायामाला वेळ नाही”, “योगासाठी वेळ कुठे आहे?” हे वाक्य आपण सहज बोलून जातो.
पण याच बिझी आयुष्यासाठी सर्वात सोपा, कमी वेळात पूर्ण शरीरासाठी परिणामकारक उपाय म्हणजे सूर्यनमस्कार.
सूर्यनमस्कार : फक्त योग नाही, एक संपूर्ण जीवनशैली
सूर्यनमस्कार म्हणजे केवळ १२ आसनांची मालिका नाही, तर तो श्वास, हालचाल, मन आणि शरीर यांचा अद्भुत समन्वय आहे. संस्कृत सुभाषित म्हणतं —“आदित्यं जपतां नित्यं रोगा नश्यन्ति निश्चयः” अर्थात जो नियमित सूर्योपासना करतो, त्याचे रोग नक्कीच दूर होतात.
कॉर्पोरेट, संसारी, बिझी लोकांनी सूर्यनमस्कार कसा करावा?
१) वेळेचा अभाव? फक्त १० मिनिटे पुरेशी आहेत
आज १० मिनिटे मोबाईल स्क्रोलिंग कमी केलं,तर ५ ते ७ सूर्यनमस्कार सहज होऊ शकतात.
सकाळी उठल्यावर, ऑफिसला जाण्याआधी किंवा संध्याकाळी घरी परतल्यावर सूर्यनमस्कार करता येतात.
“You don’t need more time,
you need better priorities.”
२) जिम, मॅट, मोठी जागा नको
सूर्यनमस्कार करण्यासाठी जिम, महागडं साहित्य, मोठी जागा याची गरज नाही.
घराच्या गॅलरीत, बेडरूममध्ये, अगदी ऑफिस ट्रिपमध्येही =साध्या कपड्यात, मोकळ्या श्वासात सूर्यनमस्कार होऊ शकतो.
३) ऑफिस स्ट्रेस आणि मानसिक ताणावर रामबाण उपाय
सतत बसून काम, स्क्रीन टाइम, डेडलाईन्स यामुळे मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, चिडचिड, चिंता या सगळ्यांवर सूर्यनमस्कार अत्यंत प्रभावी आहे.
“A calm mind is the ultimate productivity tool.”
नियमित सूर्यनमस्कार केल्याने मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि निर्णयक्षमता सुधारते
४) संसारी माणसांसाठी आरोग्याचा पाया
घर, मुलं, जबाबदाऱ्या यामध्ये स्वतःचं आरोग्य शेवटच्या क्रमांकावर जातं.
पण लक्षात ठेवा “तुम्हीच ठीक नसाल, तर सगळं कसं सांभाळणार?”
सूर्यनमस्कारामुळे पचनशक्ती सुधारते, वजन नियंत्रणात राहतं/, हार्मोन्स संतुलित राहतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते
५) सूर्यनमस्कार का गरजेचा आहे?
आजच्या जीवनशैलीत हालचाल कमी, ताण जास्त, झोप अपुरी, नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी अशा परिस्थितीत सूर्यनमस्कार म्हणजे निसर्गाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याचा मार्ग आहे.
संस्कृत सुभाषित आहे, “शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्” याचा अर्थ — शरीर हेच सर्व कर्तव्यांचं प्रथम साधन आहे.
या जागतिक सूर्यनमस्कार दिनी मोठे संकल्प नकोत, फक्त एवढंच ठरवा
“आजपासून रोज किमान ५ सूर्यनमस्कार.”
“Small daily habits create massive life changes.”
कारण सूर्यनमस्कार म्हणजे आरोग्य, ऊर्जा, शिस्त आणि स्वतःसाठी दिलेला सन्मान
कॉर्पोरेट असो, संसारी असो किंवा अतिशय बिझी आयुष्य असो लक्षात ठेवा, सूर्यनमस्कारासाठी ‘वेळ काढायचा’ नसतो,
तर ‘वेळ द्यायचा’ असतो.
आज सूर्यनमस्कार करा,
उद्या तुमचं शरीर आणि मन तुमचे आभार मानेल.







