सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
जिल्ह्यातील ज्या सैनिकांनी अल्प कालावधीसाठी सैन्यात सेवा बजावली असून आजपर्यंत माजी सैनिकांच्या व्याख्येत समाविष्ट होत नाहीत, तसेच सैन्यातून निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नसलेल्या ६५ वर्षांवरील सैनिकांचा तपशील मागविण्यात येत आहे. यासाठी दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत माहिती संकलनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र सैनिक व त्यांच्या विधवांनी आपली माहिती दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेटून सादर करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
वयोमान किंवा इतर कारणांमुळे कार्यालयात प्रत्यक्ष येणे शक्य नसल्यास संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या ई-मेल आयडी zswo_sindhudurg@maharashtra.gov.in वर किंवा मोबाईल क्रमांक ८२१९२८५७८८, ७०२८३१८४०७ या क्रमांकांवर व्हॉट्सॲपद्वारे माहिती पाठवावी. माहिती सादर करताना आर्मी नंबर, रँक व संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, रेजिमेंट, रेकॉर्ड ऑफिस, भरतीची तारीख, सेवानिवृत्तीची तारीख, निवृत्तीचे कारण, चारित्र्य तसेच युद्धात सहभाग असल्यास त्याचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे.
यासाठी पात्रतेच्या अटी स्पष्ट करताना श्री. सुकटे यांनी सांगितले की, सैन्यसेवा केलेली परंतु माजी सैनिकांच्या व्याख्येत न बसणारी ६५ वर्षांवरील व्यक्ती (विधवांसाठी वयाची अट लागू नाही), सैन्यसेवेतून बडतर्फ (Dismiss) किंवा भगौडा (Deserter) ठरलेला नसावा. तसेच KSB/ZSB कडून चरितार्थासाठी आर्थिक मदत (Penury Grant) मिळण्यास पात्र नसलेला असावा. अर्धसैनिक दलातील (Para Military Force) व्यक्तींचा यामध्ये समावेश होणार नाही. Territorial Army मध्ये सेवा केलेल्या सैनिकांचा समावेश करण्यात येणार आहे.
याशिवाय, ज्यांच्याकडे चरितार्थासाठी उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा व्यक्तींचाच विचार केला जाणार असून, सध्या पेन्शन मिळणारे, दुसऱ्या महायुद्धाचे लाभार्थी तसेच KSB/ZSB कडून चरितार्थासाठी आर्थिक मदत (Penury Grant) घेणाऱ्या लाभार्थींनी ही माहिती सादर करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.






