कणकवली | तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात असून, खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला.
या घडामोडीमुळे कणकवली तालुक्यात भाजपाकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या तीन झाली असून, संपूर्ण कणकवली विधानसभा मतदारसंघात ही संख्या चारवर पोहोचली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या राजकीय उलथापालथीमुळे ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे ‘दे धक्का’ तंत्र सध्या केवळ कणकवली मतदारसंघातच नव्हे, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मीनल तळगावकर यांच्या माघारीच्या निर्णयामुळे भाजपाचा प्रभाव अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे शनिवार असूनही निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी कोण उमेदवार माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कालच या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर आज ठाकरे सेनेच्या एकमेव विरोधी उमेदवार मीनल तळगावकर यांनीही माघार घेतल्याने प्राची इस्वालकर या या मतदारसंघातील एकमेव उमेदवार ठरल्या.
दरम्यान, २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ‘दे धक्का’ तंत्राचा आणखी फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.





