मालवण, प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटन वारशाचे जतन व प्रसार करण्याच्या उद्देशाने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण (कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित) येथे ‘हेरिटेज टूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला असून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
हा अभ्यासक्रम 11 ते 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार असून एकूण 30 क्लॉक अवर्सचा आहे. अभ्यासक्रमासाठी ₹1000/- इतकी नाममात्र फी आकारण्यात येणार असून 18 वर्षे व त्यावरील इच्छुक उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण शहराचा इतिहास, किल्ले, मंदिरे, लोककला, खाद्यसंस्कृती तसेच सागरी वारसा यांची प्रत्यक्ष भेटी व अनुभवाधारित अध्ययन पद्धतीने माहिती दिली जाणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना हेरिटेज टूर गाईड म्हणून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
विद्यार्थी, पर्यटन व्यावसायिक, होम-स्टे व हॉटेल चालक व कर्मचारी, रिक्षा व कार चालक, स्थानिक रहिवासी तसेच पर्यटन क्षेत्रात रस असलेल्या अन्य व्यक्तींना या अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येणार आहे.
प्रवेशासाठी Google Form भरणे अनिवार्य असून संबंधित लिंक महाविद्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सुमेधा नाईक, गुरुनाथ राणे व कृतिका न्हिवेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीट्स मर्यादित असल्याने इच्छुकांनी तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.







