सावंतवाडी | प्रतिनिधी
ओंकार कलामंच व पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून सावंतवाडीत पुन्हा एकदा आंतरराज्यीय “मालवणी करंडक एकांकिका स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत पालिकेच्या जनरल जगन्नाथराव उद्यानासमोर होणार असल्याची माहिती रुजूल पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवाच्या निमित्ताने कला क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिकेच्या पत्रकार कक्षात झालेल्या या पत्रकार परिषदेला ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर यांच्यासह निरंजन सावंत, आनंद काष्टे, सचिन मोरजकर, श्रेयस मुंज, भुवन नाईक, निखिल माळकर, नितेश देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रुजूल पाटणकर म्हणाले की, सुमारे दहा वर्षांपूर्वी ओंकार कलामंचाच्या माध्यमातून सावंतवाडीत मालवणी करंडक आयोजित करण्यात आला होता. कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश होता. आता हा करंडक त्याच उत्साहाने व ताकदीने पुन्हा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन, नेपथ्य व बाल कलाकारांसाठीही विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.
ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर म्हणाले की, मालवणी करंडक महोत्सवाला पूर्वी मोठा प्रतिसाद मिळाला होता. काही काळ खंड पडला असला तरी आता हा महोत्सव नव्या जोमाने पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यावेळी विविध क्षेत्रात जीवन समर्पित केलेल्या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
निरंजन सावंत यांनी सांगितले की, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ओंकार कलामंच गेली २५ हून अधिक वर्षे कार्यरत आहे. मालवणी करंडकच्या माध्यमातून पुन्हा एकदा कलाकारांसाठी संधी निर्माण करण्यात येत असून, जास्तीत-जास्त संघांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.अधिक माहितीसाठी सचिन मोरजकर (९४२११११६१६) किंवा भुवन नाईक (९६०७२९३५८८) यांच्याशी संपर्क साधावा.
——–






