मालवण प्रतिनिधी :
शिवकाळापासून चालत आलेल्या रूढी परंपरेचा मानमराबत ठेवत आज सकाळी नऊ वाजता कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आपले पंचायतन आणि हजारोंच्या संख्येने एकत्रित झालेल्या रयतेला घेऊन आपल्या प्रियजनांच्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिमाया श्रीदेवी भवानी यांच्या भेटीसाठी निघाला किल्ले सिंधुदुर्ग वर जाण्यासाठी निघालेल्या श्री देव रामेश्वराचे कांदळगाव ते मालवण या दरम्यान अनेक भाविकांनी स्वागत केले.

आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्री देव रामेश्वर मंदिरातील गुरवाने खड्या आवाजात पारंपारिक पद्धतीने गाऱ्हाणे घातले आणि एका अनामिक आत्मविश्वासाने रयत ही श्री देव रामेश्वर आणि त्याच्या पंचायतनासह मंदिराबाहेर पडली. यावेळी ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची तुफानी आतषबाजी करण्यात आली.

शिवनामाचा जयघोष करत निघालेली श्रीदेव रामेश्वराची पालखी आणि देव देवतांचे तरंग हे कांदळगाव येथून सुमारे तीन तास मालवणच्या दिशेने कूच करीत होते.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कांदळगावच्या रामेश्वराचे आगमन मालवण शहरात झाले तत्पूर्वी कोळंब येथे मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी व्यापाऱ्यांसह तसेच नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी नगरसेवकांसमवेत श्रीदेव रामेश्वराचे स्वागत केले.

यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, सहदेव बापर्डेकर, नगरसेविका पूनम चव्हाण, अश्विनी कांदळकर, मेघा सावंत, तसेच परशुराम पाटकर, शिल्पा खोत, यतीन खोत, गणेश नेरकर, परशुराम पाटकर, राजू बिडये, संदेश कोयंडे, गणेश प्रभूलकर, सूर्यकांत फणसेकर, राजन वराडकर, छोटू तारी आदी व इतर उपस्थित होते.

आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कांदळगाव येथून आपल्या राऊळातून निघालेल्या श्री देव रामेश्वराने तब्ब्ल सात तासांनी आपल्या पंचायतनसह रयते समवेत मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट घेतली अन उपस्थित साऱ्यांनीच दोन शिवांच्या या भेटीचा अनुपम सोहळा याची देही याची डोळा अनुभवत शिवनामाचा एकच जयघोष केला.

या भेटी दरम्यान श्री देव रामेश्वर आणि त्याच्या पंचायतनसह रयते समवेत आदी माया आदी शक्ती आई भवानीचे दर्शनही घेतले. जवळपास तीन तास किल्ले सिंधुदुर्गवर रंगलेल्या या सोहळ्याने साऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी शिवनामाचा जोरदार गजर करण्यात आला यावेळी श्री देव रामेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वतीने एकमेकांना भेटीचे नजराणे देण्यात आले.






