नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दराने उसळी घेतली असून, 1 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या अवघ्या दीड महिन्यांत सोने तोळ्यामागे तब्बल 23 हजार रुपयांनी महागले आहे. बुधवारी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने प्रतितोळा 1 लाख 41 हजार 980 रुपये इतक्या उच्चांकावर पोहोचले, तर मुंबई सराफ बाजारात या सर्व विक्रमांना मागे टाकत सोन्याचा दर तोळ्याला 1 लाख 61 हजार रुपये झाला.
मुंबईत जीएसटी आणि घडणावळीचा समावेश केल्यानंतर ग्राहकांना तोळ्यामागे 1 लाख 75 हजार 830 रुपये मोजावे लागले. एवढ्या प्रचंड दरवाढीमुळे ग्राहकांनी अक्षरशः सराफ बाजाराकडे पाठ फिरवली असून खरेदी मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र आहे.
मुंबई सराफ बाजारात एका दिवसातच सोने तोळ्यामागे 10 हजार रुपयांनी महागले. साधारणपणे दररोज 100 ते 150 कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या बाजारात बुधवारी केवळ सुमारे 50 कोटी रुपयांचीच उलाढाल झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईत जीएसटी आणि घडणावळीसह सोन्याचा दर 1 लाख 52 हजार 140 रुपये होता. मात्र 21 तारखेला एका दिवसातच मुंबईत हा दर 10 हजारांनी, तर जळगावमध्ये 11 हजार रुपयांनी वाढला. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात सोन्याच्या दरात इतकी मोठी वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिक सांगतात. दिवसभरात दरांमध्ये मोठी चढ-उतार सुरू होती.
मकरसंक्रांतीनंतर सोन्याच्या बाजारात आलेली झळाळी लवकर कमी होण्याची चिन्हे नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत सोने तोळ्यामागे 1 लाख 70 हजार रुपये, तर चांदी किलोमागे 2 लाख 75 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज कुमार जैन यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, चांदीही किलोमागे 10 हजार रुपयांनी महागली आहे. मंगळवारी 20 जानेवारीला चांदीचा दर 2 लाख 25 हजार रुपये किलो होता, तो बुधवारी 2 लाख 35 हजार रुपये किलो झाला. सोन्याबरोबरच चांदीच्या दरवाढीमुळेही गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.






