कणकवली | प्रतिनिधी
कणकवली विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले असून महायुतीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या कणकवली–देवगड–वैभववाडी मतदारसंघात ही महत्त्वाची घडामोड घडली आहे.
वैभववाडी पंचायत समितीतील कोकिसरे मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार सौ. साधना नकाशे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच कणकवली पंचायत समितीतील बिडवाडी मतदारसंघातून सौ. संजना राणे यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
अर्ज छाननी आणि माघार प्रक्रियेनंतर विरोधी पक्षांकडून कोणताही उमेदवार रिंगणात न राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड घोषित केली. या यशामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
या बिनविरोध निवडीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.






