अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी
जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २८, पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५३ अर्ज
महायुतीचे अधिकृत उमेदवार मैदानात; भाजपा-शिवसेनेची ताकद दाखल
उबाठा व अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक रिंगणात उतरून रंगत वाढवली
उद्या सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छानणी
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला होता. जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी २८ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५३ असे एकूण ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मालवण तहसील कार्यालयात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दुपारी तीन वाजेपूर्वी अर्ज भरणा कक्षात उपस्थित असलेल्या उमेदवारांना टोकण देण्यात आले होते. टोकनधारक उमेदवारांचे अर्ज सायंकाळी उशिरापर्यंत स्वीकारण्यात आले. गुरुवारी सकाळी ११ वाजता दाखल अर्जांची छाननी होणार आहे.
मालवण तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी महायुतीच्या अधिकृत सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून आडवली-माडली, आचरा, पेंडूर, वायरी भूतनाथ आणि सुकळवाड या मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, भाजपाकडून मसुरे–मर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यात आली आहे.
पंचायत समितीच्या १२ जागांपैकी भाजपाकडून वायरी भूतनाथ, कोळंब, चिंदर, आडवली-मालडी, सुकळवाड व वराड या सहा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून शिरवंडे, आचरा, मसुरे-मर्डे, पोईप, पेंडूर आणि कुंभारमाठ या सहा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
याशिवाय उबाठा गटाकडून तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याने मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.







