सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार, २१ जानेवारी असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, मंगळवार २० जानेवारीअखेरपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहता राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या ५० गटांसाठी केवळ १२, तर पंचायत समितीच्या १०० गटांसाठीही फक्त १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एकच दिवस शिल्लक असतानाही एकाही प्रमुख राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ५०३, तर पंचायत समितीसाठी ७५७ असे एकूण १,२६० कोरे उमेदवारी अर्ज विकले गेले आहेत. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी १२ आणि पंचायत समितीसाठी १२, असे एकूण २४ अर्जच दाखल झाले आहेत. कोरे अर्जांची संख्या आणि प्रत्यक्ष दाखल अर्जांमधील ही मोठी तफावत अनेक राजकीय शक्यतांना वाव देणारी ठरत आहे.
तालुकानिहाय अर्जांची स्थिती
जिल्हा परिषद – कणकवली : ३, कुडाळ : २, वेंगुर्ला : २, सावंतवाडी : ५ (सर्वाधिक)
एकूण : १२ अर्ज
पंचायत समिती – कणकवली : १, कुडाळ : १, मालवण : १० (सर्वाधिक)
एकूण : १२ अर्ज
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ बुधवार दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे बुधवार सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित निवडणूक केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
एकीकडे जिल्ह्यात मंगळवारी अनेक नाराजांनी राजीनामाअस्त्र काढत छुप्या बंडाचे निशाण रोवले असताना युतीतुन सगळं काही आलबेल असल्याचे रंजक चित्र दाखवले जात आहे. तर दुसरीकडे अधिकृत उमेदवार याद्या जाहीर न करण्यामागे बंडखोरी टाळण्याची रणनीती असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजप, शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे गट या प्रमुख पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र युती व जागावाटपामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य उमेदवारांना वैयक्तिक पातळीवर अर्ज भरण्याचे संकेत दिले गेले असून ही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना, जिल्ह्यातील राजकीय हालचालींना अनपेक्षित वळण मिळाले आहे. हजारोंच्या संख्येने कोरे अर्ज विकले गेले असतानाही प्रत्यक्षात अत्यल्प उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
एकीकडे पक्षांकडून अधिकृत उमेदवार याद्या जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे शेवटच्या दिवशी होणाऱ्या अर्ज भरण्याच्या झुंबडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून आखली जाणारी ‘गुप्त’ रणनीती हीच या शांततेमागील खरी कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे.





