कुडाळ, दि. प्रतिनिधी :
आपण नशिबाला दोष न देता नशीब सोबत घेऊन पुढे गेलो, तर यश निश्चित मिळते. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. महावितरणच्या कंत्राटी कामगारांवर अन्याय झाला तेव्हा आम्ही संघटितपणे लढा दिला आणि यशस्वी झालो. भविष्यातही गटबाजी न करता सर्वांनी एकत्र यावे, असे प्रतिपादन वीज वितरण कंत्राटी कामगारांचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी केले.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशन कुडाळ येथे संघटनेचे राज्य नेते सागर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी राज्यस्तरीय नेते सत्यविजय जाधव, गोपाळ कुलकर्णी, कृष्णांत बच्चेपाटील, केंद्रीय कार्यकारणी सदस्य संभाजी उर्फ आनंद लाड, जिल्हा अध्यक्ष संदीप बांदेकर, दिनेश तांबे, मोहन गावडे, सचिन राघव, सर्वेश राऊळ, संजय गोवेकर, महेश राऊळ तसेच महानिर्मिती, महापारेषण व महावितरण विभागात कार्यरत असलेले जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिवेशनात बोलताना अशोक सावंत म्हणाले की, कोणतेही यश मिळवायचे असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही. गेली कित्येक वर्षे लढा देत असताना एकाच वेळी साडेपाचशे वीज कंत्राटी कामगारांचा प्रश्न आमचे नेते व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागला होता. भविष्यात येणारे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तक्रारी करण्यापेक्षा काम करा, आपली ओळख वाढवा आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एका छताखाली यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्य नेते सागर पवार यांनी संघटित लढ्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, मी उपदेश देण्यासाठी आलो नाही, तर आपली संघटना अधिक भक्कम कशी होईल यासाठी काम करणे गरजेचे आहे. कंत्राटी कामगारांचा पूर्वीचा काळ आणि आजची परिस्थिती यावर त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही कंत्राटी कामगारांसाठी चालवली जाणारी चळवळ असून, ही चळवळ अविरत सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सत्यविजय जाधव यांनी संघटना वाढवणे, सदस्यसंख्या वाढवणे आणि सर्व कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एकजूट आवश्यक असल्याचे सांगितले. केंद्रीय कार्यकारणी सदस्य आनंद लाड यांनी केंद्रीय पातळीवर कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. नूतन जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर यांनीही मार्गदर्शन करताना तळागाळातील प्रत्येक कंत्राटी कामगाराला नवीन योजना व पगारवाढीचा लाभ कसा मिळेल, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सांगितले.
अधिवेशनाच्या शेवटी केंद्रीय कार्यकारणीवर निवड झालेल्या माजी जिल्हाध्यक्ष आनंद लाड तसेच नूतन जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर व त्यांच्या टीमचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.






