सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा तिठा येथील एका जिमच्या मालकाला कॉपीराईट उल्लंघनाच्या आरोपाखाली ५० लाख रुपयांची नोटीस मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जिममध्ये गाणी वाजवल्याबद्दल पाठवण्यात आलेल्या या नोटिसमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, व्यापारी वर्गात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नोटिसमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जिममध्ये वाजवलेली गाणी मुंबईतील एका विशिष्ट संस्थेच्या मालकीची आहेत. कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून ही नोटिस एका महिला वकिलाच्या नावावर पाठवण्यात आली आहे.
व्यावसायिकांनी या घटनेला नवीन प्रकारची धमकी म्हणून पाहिले असून, व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघाने तातडीने दखल घेतली असून, अशा नोटिसांना कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा पत्रांपासून घाबरू नका, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि थेट महासंघाशी संपर्क साधावा, असे नितीन वाळके यांनी सांगितले आहे.






