आचरा (प्रतिनिधी):
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी संघटनात्मक हालचालींना वेग दिला असून ते एक्शन मोडवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अनुषंगाने आडवली मालडी, मसुरे व आचरा या तीन महत्त्वाच्या मतदारसंघांतील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आचरा येथे संयुक्त बैठक पार पडली.
ही बैठक शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सामंत साहेब यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत येणाऱ्या निवडणुकांसाठीची रणनीती, बूथनिहाय बांधणी, कार्यकर्त्यांची जबाबदारी, मतदारांपर्यंत पोहोचण्याची पद्धत तसेच प्रचाराचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी दत्ता सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, संघटन मजबूत ठेवून प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणूक यंत्रणेचा केंद्रबिंदू असावा. जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत विश्वासार्ह आणि प्रभावी उमेदवार उभे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शिवसेनेची भूमिका घराघरात पोहोचवण्यासाठी संपर्क अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत स्थानिक प्रश्न, विकासकामे, तसेच मतदारसंघनिहाय ताकद व आव्हाने यावर खुली चर्चा झाली. आगामी काळात प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र बैठकांचे आयोजन करून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस शिवसेनेचे तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, तसेच आडवली मालडी, मसुरे व आचरा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







