मालवण (प्रतिनिधी) –
मालवण शहरातील दांडी भागासह संपूर्ण शहरात मोकाट गुरांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार मालवण नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दांडी येथील नागरिक व पर्यटन व्यावसायिक रश्मीन रोगे यांनी मालवण नगरपालिकेकडे केली आहे.
रश्मीन रोगे यांनी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडे निवेदन सादर करत १५ दिवसांत योग्य उपाययोजना न झाल्यास नाईलाजाने सुरक्षित स्थळ म्हणून कुटुंबासह नगरपालिकेत स्थलांतर करावे लागेल, असा इशाराही दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दांडी भागात मोकाट गुरांचा वावर वाढल्याने नागरिकांना घरातही असुरक्षित वाटत आहे. ही गुरे कधीही थेट घरात प्रवेश करत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षांच्या नगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ क्लिप प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. तसेच अनेक वेळा पाठपुरावा करूनही या समस्येचे निराकरण करण्यात आलेले नाही.
प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी निवडून आल्याने आता तरी या समस्येकडे गांभीर्याने पाहून मोकाट गुरांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करत यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येत असल्याचेही रश्मीन रोगे यांनी स्पष्ट केले आहे. दिलेल्या मुदतीत उपाययोजना न झाल्यास कुटुंबासह नगरपालिकेत स्थलांतर करावे लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी शहरातील मोकाट गुरांच्या संचारामुळे नागरिकांना होत असलेला त्रास गांभीर्याने घेत असून लवकरच याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी मोकाट गुरांच्या मालकांमध्ये जनजागृती करून आवश्यक ती कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.






