मालवण (प्रतिनिधी) –
ग्रामीण भागात पिकवली जाणारी विविध धान्ये तसेच त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान आणि विक्री कौशल्य विकसित व्हावे, तसेच स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे गावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
या गावठी आठवडी बाजाराचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर आणि संस्थेचे सहसचिव श्री. साबाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव श्री. सुनील नाईक, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या बाजारात गावठी उकडे तांदूळ, सुरय तांदूळ, कुळीथ, चवळी, वालीचे गर, नाचणी, शेंगा, कोकम, आगळ, खोबरेल तेल, गावठी हळद, गावठी अंडी, पिठी, घावणे पीठ, वडे पीठ, कणगी, करांदे, सुरण, नारळ, शहाळी, सुके खोबरे, विविध गावठी भाज्या, बांबू उत्पादने तसेच मातीच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. या बाजाराला परिसरातील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहात भेट देत उस्फूर्त प्रतिसाद दिला.
तसेच स्काऊट–गाईड विभागामार्फत ‘विद्यार्थी खरी कमाई’ स्टॉल अंतर्गत स्काऊट–गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करत अर्थार्जनाचे प्रत्यक्ष धडे घेतले.
या संपूर्ण उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. महेश भाट तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲडव्होकेट एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर तसेच सर्व संचालक व संचालिकांनी या स्तुत्य उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.







