मालवण | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी तसेच शाळेत ये–जा करण्याचा त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावा, या उद्देशाने कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून अखिल देवबाग विकास मंडळ, मुंबई संचलित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग येथील इयत्ता आठवी ते दहावीमधील २५ गरजू विद्यार्थी–विद्यार्थिनींना मोफत सायकली व हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
या सायकलींचे वाटप कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड कंपनीचे मुंबई ब्रांच आयटी हेड दीपेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे गोवा ब्रांच सेल्स मॅनेजर सुरज साळगावकर, ऑपरेशन इन्चार्ज स्नेहल मातोंडकर तसेच पत्रकार अमोल गोसावी उपस्थित होते. व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना रुपेश खोबरेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास येरागी, संस्था सदस्य निलेश सामंत आणि श्रीमती तारी हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपेश गोसावी यांनी सांगितले की, “शिक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. भविष्यात शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पटसंख्या वाढल्यास कंपनीच्या वतीने अधिक मोठ्या प्रमाणात व अधिक चांगल्या प्रकारची मदत करण्याची आमची इच्छा आहे.”
या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक विवेक गोसावी यांनी केले, तर आभार प्रदर्शन रुपेश खोबरेकर यांनी मानले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल पालक व ग्रामस्थांनी कॅनरा रोबेको कंपनीचे विशेष आभार व्यक्त केले.






