मालवण | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजलेल्या श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी भजन मंडळ, आचरा–पारवाडी यांच्या वतीने पंढरपूर येथे सादर करण्यात आलेल्या दिंडी भजनाने भाविक व रसिकांना मंत्रमुग्ध केले. विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरीसमोर सादर झालेल्या या भक्तीरसपूर्ण कार्यक्रमामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विठ्ठल दर्शनासोबतच तुकोबा महाराजांच्या साक्षात दर्शनाची अनुभूती लाभली.
आचरा–पारवाडी येथील या दिंडी भजन मंडळाने पंढरपूर वारीचे सुसूत्र नियोजन करत अक्कलकोट येथील स्वामी समर्थ व तुळजाभवानीचे दर्शन घेऊन पंढरपूर येथे विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण केली. नामदेव पायरीसमोर वारकरी वेषात विठ्ठल नामाचा गजर करत पावलानृत्यासह दिंडी भजन सादर करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या सादरीकरणाने पंढरपूरातील भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारलेले अवि परब यांच्या प्रभावी अभिनयामुळे उपस्थित भाविकांना साक्षात तुकोबा महाराजांचे दर्शन झाल्याचा अनुभव आला. त्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.
आचरा–पारवाडी येथील या पंढरीच्या वारीत दिंडी समूहातील एकूण ५३ सदस्य सहभागी झाले होते. सर्व भक्तजनांनी पांडुरंगाच्या चरणी लीन होत आपली सेवा दिंडी भजनाच्या माध्यमातून अर्पण केली. या ‘धार्मिक-सांस्कृतिक सहली’चे संपूर्ण नियोजन श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी भजन मंडळ, आचरा–पारवाडी यांच्या वतीने करण्यात आले.






