मालवण (प्रतिनिधी) : लोकशाहीचा कट्टर कैवारी, निर्भीड समाजवादी नेते बॅ. नाथ पै यांचा ५५वा स्मृतीदिन यंदा राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग शाखेच्या विद्यमाने गोपुरी आश्रम, वागदे–कणकवली येथे आयोजित करण्यात येणार आहे. हा निर्णय काल झालेल्या सेवादलाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला.
ज्येष्ठ समाजवादी नेत्या श्रीम. कमलताई परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा स्मृतीदिन सोहळा संपन्न होणार असून, “बॅ. नाथ पै स्मृती ५५ – एक पाय ज्याचा तुरुंगात आणि दुसरा संसदेत” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्मृतीदिनी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक जागल्या मा. आनंद शितोळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर, राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ राष्ट्रीय कार्यकर्ते मा. बाबासाहेब नदाफ, सुप्रसिद्ध लेखक नितीन साळुंखे आणि रानमाणूस प्रसाद गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
गोपुरी आश्रमाच्या मुक्तपीठात (चिकू बाग) आयोजित करण्यात आलेल्या या स्मृतीदिन कार्यक्रमास तमाम नाथप्रेमींनी रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्गचे अध्यक्ष ॲड. प्रविण नाईक यांनी केले आहे.
या स्मृती ५५ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विनायक उर्फ बाळू मेस्री यांच्या नेतृत्वाखाली सुहास ठाकूरदेसाई, संजय वेतुरेकर, नितीन वाळके, डॉ. सुभाष सावंत, मुर्ती कासार, सहदेव पाटकर, सुचन कोरगांवकर, विजयालक्ष्मी चिंडक, अर्पिता मुंबरकर, प्रज्ञानकुमार गाथाडेसर, पुजा वेतुरेकर आदींची आयोजन समिती नियुक्त करण्यात आली आहे. बॅ. नाथ पै आणि प्रा. मधु दंडवते यांच्या समाजवादी विचारांचा वारसा पुढे नेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी या स्मृती ५५ कार्यक्रमात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता नावनोंदणी व अल्पोपहाराने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.५९ ते ११.१५ या वेळेत लोकशाहीचा कैवारी बॅ. नाथ पै यांना अभिवादन करून प्रार्थनेने कार्यक्रमाचा विधिवत प्रारंभ करण्यात येणार आहे.
यानंतर ११.१५ ते ११.२० या कालावधीत स्वागतपर मनोगत होणार असून, ११.२० ते ११.३० दरम्यान कार्यक्रमाची प्रस्तावना मांडण्यात येणार आहे. सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत विविध सामाजिक, राजकीय व वैचारिक विषयांवर मान्यवर वक्त्यांची सखोल मांडणी होणार आहे.
दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत सहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून, त्यानंतर ३.०० ते ४.३० दरम्यान मुक्त चर्चा व सन २०२६ मधील भावी कार्यक्रम व उपक्रमांची आखणी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप ४.४५ ते ५.०० या वेळेत आभारप्रदर्शनाने होणार आहे.
या स्मृतीदिनाच्या निमित्ताने बॅ. नाथ पै यांच्या लोकशाहीवादी, समाजवादी आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग शाखेने व्यक्त केला आहे.





