
मालवण | प्रतिनिधी मालवण दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जत्रेनिमित्ताने दांडी किनारा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
जत्रोत्सवानिमित्त सकाळपासून श्री देव दांडेश्वर मंदिरात विधीवत पूजा-अर्चा संपन्न झाली. श्री देव दांडेश्वराची मूर्ती आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. मूर्तीच्या मागील गाभाऱ्यात देखाव्याचे चित्र आणि फुलांची सुंदर आरास करून मंदिर सजावट करण्यात आली होती. सायंकाळी चार वाजल्यापासून धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

रात्री उशिरापर्यंत भाविकांची लक्षणीय गर्दी उसळली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे दांडी किनारा भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता. जत्रेनिमित्त मंदिर परिसरासह मंदिरासमोरील समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई विशेष लक्षवेधी ठरली. भाविकांसाठी उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंटही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

जत्रेसाठी भव्य प्रवेश कमान व स्वागत कमान उभारण्यात आली होती. तसेच समुद्राच्या भरतीचा फटका बसू नये यासाठी किनाऱ्यावर वाळूचा बंधारा उभारण्यात आला होता. जत्रेदरम्यान किनाऱ्यावर विविध खाद्यपदार्थांचे व खेळण्यांचे स्टॉल आणि दुकाने थाटण्यात आली होती.

रात्री दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. पहाटेपर्यंत चाललेल्या या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी जत्रोत्सवाला रंगत आणली आणि पहाटे या जत्रेची उत्साहात सांगता झाली.







