मालवण : मालवण नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार, याबाबत गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. १२ जानेवारी रोजी नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा निर्णय होण्याची शक्यता असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक दीपक पाटकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मालवण नगरपालिकेवर शिंदे शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याने, शिवसेनेकडून निश्चित होणारा उमेदवारच उपनगराध्यक्षपदी निवडून येईल, अशी चर्चा आहे.
स्वीकृत नगरसेवक पदाबाबत संख्याबळ लक्षात घेता शिवसेना आणि भाजप यांना प्रत्येकी एक-एक स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तर भाजपकडून भाजपचे मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक व मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
मालवण नगरपालिका निवडणुकीत शिंदे शिवसेनेने नगराध्यक्षपदासह दहा नगरसेवक मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपचे पाच, ठाकरे शिवसेनेचे चार तर एक अपक्ष नगरसेवक असे संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार शिंदे शिवसेना व भाजप यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांनाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि युवा नेतृत्व राजू बिडये यांची नावे चर्चेत होती. मात्र, नगरपालिकेतील अधिकारी म्हणून तसेच त्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून कांदळगावकर यांचा असलेला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, पक्ष नेतृत्वाकडून त्यांना पसंती दिल्याचे बोलले जात आहे.
भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी नगरसेवक यतीन खोत, सौ. शिल्पा खोत, गणेश कुशे, सेजल परब, बाबा मोंडकर यांची नावे चर्चेत होती. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने भाजपचे मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांना पसंती दिल्याचे सांगितले जात आहे. तोरसकर हे नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे कार्यकारिणी सदस्य असून, जिल्ह्यातील मच्छिमारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचा आजवर सक्रिय सहभाग राहिला आहे.
नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब होणार का, याकडे मालवणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.






