मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर आजचा रविवार प्रचाराचा ‘सुपर संडे’ ठरणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे.
याच निर्णायक क्षणी शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होत असून, ही सभा विक्रमी ठरावी यासाठी दोन्ही भावांच्या यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. या सभेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले असून, मुंबईच्या राजकारणात ही सभा प्रचाराची दिशा ठरवणारी ठरेल, अशी चर्चा आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. त्याआधी १३ जानेवारीला प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने प्रचारासाठी आता अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आजपासूनच प्रचाराचा शेवटचा, अत्यंत निर्णायक टप्पा सुरू झाला आहे.
या टप्प्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच वंचित बहुजन आघाडी यांचे प्रमुख नेते राज्यभरात सभांचा धडाका उडवणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसह प्रमुख शहरे अक्षरशः प्रचाराने ढवळून निघणार आहेत.
विशेष म्हणजे ११ जानेवारीचा आजचा रविवार हा प्रचारातील शेवटचा सुट्टीचा दिवस असल्याने तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सुट्टीचा फायदा घेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. मोटारसायकल रॅली, पदयात्रा, रोड शो, कॉर्नर सभा आणि प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा—आज प्रत्येक प्रभागात प्रचाराची धग दिसणार आहे.
एकूणच, मतदानाच्या तोंडावरचा हा ‘सुपर संडे’ कोणाच्या पारड्यात जड जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






