मालवण | प्रतिनिधी
मालवण दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा या रस्त्यावर भाजपच्या मालवण नगरपालिकेतील गटनेत्या तथा नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर, माजी नगरसेविका सौ. सेजल परब तसेच भाजप उपतालुकाध्यक्ष सन्मेष परब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून १९ सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे अंधारात असलेला हा रस्ता अखेर प्रकाशमान झाला आहे.
श्री देव दांडेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने हे काम पूर्ण करण्यात आले असून नुकतेच या सौर पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे दांडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा या रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत होती. शिवाय पर्यटनाच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा असल्याने येथे पथदिवे बसवावेत, अशी मागणी दांडीवासीयांकडून सातत्याने होत होती. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या सौर पथदिव्यांचे लोकार्पण स्थानिक नागरिक गिरीधर आचरेकर व शरद आगवणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर, माजी नगरसेविका सौ. सेजल परब, भाजप उपतालुकाध्यक्ष सन्मेष परब यांच्यासह दांडी येथील अनेक नागरिक उपस्थित होते.






