सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी दि. १० व ११ जानेवारी रोजी वाडीया पार्क, अहिल्यानगर येथील क्रीडांगणावर पार पडणार आहे.
या निवड चाचणीत १४ ते १५ वयोगटातील (जन्म २०११ ते २०१२) मुला-मुलींना सहभागी होता येणार असून, या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलिंग कारकिर्द घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
निवड चाचणीअंतर्गत मुलांसाठी १६०० मीटर धावणे, व्हर्टिकल जम्प व ब्रॉड जम्प, तर मुलींसाठी ८०० मीटर धावणे, व्हर्टिकल जम्प व ब्रॉड जम्प या शारीरिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांच्या आधारे खेळाडूंची निवड केली जाणार असून ही प्रक्रिया रोड सायकलिंग, ट्रॅक सायकलिंग व माउंटन बाईक (एमटीबी) या स्पर्धा प्रकारांसाठी असेल.
निवड प्रक्रियेत यशस्वी ठरणाऱ्या खेळाडूंना स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे उच्च दर्जाचे प्रशिक्षण, निवासी सुविधा तसेच क्रीडा शिष्यवृत्ती मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
निवड चाचणीस उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनी जन्मदिनांकाचा दाखला, शैक्षणिक गुणपत्रिका, आधारकार्ड व पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सचिव अजय शिंदे (मो. ९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा.






