महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मालवण संचलित डॉ. एस. एस. कुडाळकर प्राथमिक शाळा, मालवण येथील मुख्याध्यापिका सौ. प्राची प्रशांत परब यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील २५ वर्षांच्या निष्ठावान, सेवाभावी व यशस्वी कार्याची दखल घेऊन ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी यांच्या हस्ते सौ. प्राची परब यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत केलेली सातत्यपूर्ण वाढ तसेच नेतृत्वगुण आणि शिक्षक म्हणून दाखवलेली निष्ठा या बाबींची विशेष दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी व्यासपीठावर श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशनचे उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, सचिव महेश मांजरेकर, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष गणपत चौकेकर, उपाध्यक्षा सौ. गुळवे, सचिव श्री. नार्वेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






